Monday, April 21, 2014

नक्षत्रचित्रे


खरे सांगायचे झाले तर, या ब्लॉग series ची सुरुवात कशी करावी हा एक प्रश्न होता. योगायोगाने म्हणा, मी शांताबाई शेळकेंच 'नक्षत्रचित्रे' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वी वाचायला घेतलं आणि मग विचार आला, यांनीच का सुरु करू नये? या पुस्तकाबद्दल लिहिण्याची २ करणं - १. पुस्तकाचं नाव आणि २. पुस्तकाचा आशय. हे एक छोटेखानी पुस्तक आहे आणि माझ्या मराठी साहित्याच्या 'अफाट' ज्ञानामुळे खरोखर या पुस्तकाच्या प्रसिद्धीबाबत मला माहिती नाही.
पुस्तक उचललं ते नावामुळे आणि अर्थात शांताबाई लेखिका म्हणून. प्रारंभिक डॉ. अरुणा ढेरे यांनी लिहिलंय आणि तंतोतंत त्या म्हणतात तसं, नक्षत्रचित्रे हे किती सुंदर नाव ! शान्ताबाईंची हि खासियत असावी - लेखन विषयाला अनुसंगून अतिशय शोभणारं नाव निवडणं. चपखल. समृद्ध शब्दसंपदा असणं एक पण एवढ्या मोठ्या आशयाचा सारांश सहज एखाद्या शब्दात पकडणं काही निराळंच ! आजून एक असंच नाव जे एकदम पटलं, ते म्हणजे 'मृद्गंध'. इंदिराबाई संतांच ते पुस्तक. स्वतःच्या आयुष्यावर लिहिलेलं.
नक्षत्रचित्रे मध्ये शान्ताबाईंना  भेटलेल्या आठ नक्षत्रांवर त्यांनी लिहिलेल्या लेखांच संकलन आहे. हे लोक म्हणजे, भालजी पेंढारकर, सुधीर फडके, कुसुमाग्रज, इंदिरा संत, भा. रा. भागवत, रणजीत देसाई, व. पु. काळे आणि विजया राजाध्यक्ष. यातल्या बऱ्याच जणांची पहिली ओळख पाठ्यपुस्तकातील ! नंतर थोडाफार वाचन झालेलं. ही नावे पाहिल्यावर माझ्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली की या दिग्गज लोकांबाबत बाईंसारख्या लेखिकेनी काय आणि कसं लिहिलं असेल. पहिली भावलेली गोष्ट म्हणजे, सगळं मनमोकळ लिहिलंय. ज्या नात्यांमध्ये थोडा औपचारीक भाव, आदरयुक्त भीती होती ते तसच लिहिलंय आणि ज्या लोकांबरोबर मैत्री होती ते तस. कुठला आव आणलेला नाही. या सर्व लोकांच्या स्वभावाचे पैलू समोर येताना, शान्ताबाई पण समजत जातात. स्वतःच्या गुणदोषाबद्दल मोकळेपणाने लिहितात. हे लेख वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या वेळी लिहिलेले आणि वेगवेगळ्या मासिकांत छापून आलेले. त्यामुळे असेल, पण प्रत्येक लेखाच्या तपशीलात फरक अहे. शान्ताबाई हयात असेपर्यंत हे लेख संकलित होऊन पुस्तक रुपात येऊ शकले नाहीत. कदाचित त्या असताना हे झालं असतं, तर अजुन सुरस झालं असतं. तसं असलं तरी हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे. नाहीतर माझ्यासारख्यांना या नक्षत्रांच असं चित्रण कधी दिसणार आणि कोण दाखवणार? वरच्या चित्रातल्यासारख? :)



image source - http://fernhillresorts.com/

Sunday, April 20, 2014

आपली आवड



:) या ब्लॉग विषयीची संकल्पना आधी. गेला एक महिना मी पुण्यात आहे आणि आयुष्य बंगलोर पेक्षा नक्कीच सैलावलेलं, थोडं संथ. हातात थोडा वेळ आहे म्हणून बंगलोरहून निघताना हेss सगळं प्लान केला होतं. लोकांना भेटणे, आईशी गप्पा मारणे, वाचन, चित्र काढणे, पेटी वाजवणे, उत्तम संगीत ऐकणे आणि बंगलोरहून आणलेलं काम संपवणे.. यादी तर बरीच मोठी. यातल्या बऱ्याचश्या गोष्टी चालूही अहेत. या यादीत एक गोष्ट मात्र नक्की नव्हती. ती म्हणजे ब्लॉग लिहिणे !

काल काम करत असताना अचानक मला काही महिन्यापूर्वी झालेली एक गोष्ट आठवली. माझी सहकारी आणि मी PGI, चंडीगढ ला कामानिम्मित्त गेलो होतो. आमचे PGI मधले यजमान एक प्रसिद्ध neurosurgeon होते. आमचं काम आटोपल्यावर ते त्यांच्या कुटुंबासमवेत आम्हाला रात्री जेवायला घेऊन गेले. यथासांग सगळं चालू होतं आणि साहेब हळू हळू तर्र व्हायला लागले. गाडी मी थोडीफार पेटी वाजवते यावर आली. कुठली पेटी वगैरे प्रश्न झाले. आमच्या घरची पेटी जवळ जवळ ९० - १०० वर्षे जुनी असेल. आमच्या पणजीची. फार गोड आवाज. साहेब म्हणाले, 'कुठे बनवली ?' मी म्हणाले, 'मुंबई'. ते म्हणाले, 'म्हणजे कोणी?' प्रश्न मला अनपेक्षित होता. मी म्हणाले 'माहिती नाही'. त्यांचा चेहरा बदलला. . जणू काही माझ्या गेल्या काही दिवसांच्या कामामुळे माझ्याबद्दल जो काही थोडा आदर त्यांच्या मनात साठला होता तो झर्रकन उतरत होता. ते म्हणाले, 'अर्देशीर आणि कं. असेल. जाऊन बघ. It will remain your hobby. You will not master it.' मी थोडी चपापले. मला त्यावेळी थोडा रागही आला. मी  म्हणाले, ' हो. ती माझी hobby च आहे.' आम्ही परतीच्या वाटेवर निघालो पण हा विषय डोक्यात रेंगाळला. त्यांचा आत्मप्रौढीचा स्वभाव इत्यादी गोष्टी बाजूला सारून विचार केला तर एक जाणवलं. बहुदा लोकं किमान दोन प्रकारची असणार. १. छंद जोपासणारे २. आवड असणारे. मी बहुतांशी प्रकार २ असणार.

म्हणजे एखाद्या दीड वर्ष्याच्या मुलासमोर ढीगभर खेळणी ओतली तर त्याचं कस होईल? तो आधी थोडासा बावचळून जाईल मग ती खेळणी नीट बघून दृष्टीने काही त्यातली आवडणारी ठरवेल आणि एकानंतर एक खेळणं हातात घेईल. माझंही थोडं तसंच आहे. . म्हणजे मला बऱ्याच गोष्टी 'आवडतात' आणि मला जसा वेळ असेल आणि मूड असेल तश्या गोष्टी मी करते. ह्या प्रक्रियेला वरकरणी तसा काही साचा किंवा दिशा नाही. एक मात्र आहे, तो एक तरल आणि सुखद अनुभव असतो. ही  ब्लॉग series लिहायचं कारण एवढंच, या मार्फत ज्या गोष्टी मला आनंददायी वाटतात, त्या मी सर्वांबरोबर वाटाव्यात. इथे लिहिलेल्या गोष्टी फार अभ्यासपूर्ण नसतील कदाचित पण माझ्या मनाला काही कारणांनी रुचलेल्या, भावलेल्या असतील. म्हणलं, हे अभ्यासाचं बंधन न ठेवता, स्वतःच्या (अ)शुद्धलेखनाची भीती न बाळगता लिहून बघू एकदा.. हा माझ्यासाठी नक्कीच एक नवीन प्रयोग असेल :) फार मोठ्ठी प्रस्तावना झाली नाही? :p

image source - http://karenmaezenmiller.com/